कृष्णमूर्ती पद्धती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कृष्णमूर्ती पद्धती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, ९ ऑक्टोबर, २०१५

राहु पितरांचा दर्शक

आपल्या ज्ञात अज्ञात पूर्वजांचे स्मरण करण्यासाठी शास्त्रकारांनी भाद्रपदमासातील कृष्णपक्षाची योजना केली आहे. या काळात कुळाचाराप्रमाणे श्राद्धाचे विहित कर्म करून पितरांचे स्मरण करण्याची प्रथा आहे. आधुनिक काळात आपापल्या श्रद्धेप्रमाणे, सोयीप्रमाणे पितरांचे स्मरण करण्याच्या नव्या रुढी पडत चालल्या आहेत. आपल्या पूर्वजांकडून आपण संपत्ती, गुणदोष, चालीरीती, संस्कार अशा अनेक गोष्टी कळत नकळत घेत असतो. आपल्या हातून घडणाऱ्या चांगल्या वाईट कर्मांमध्ये या वारशाचा वाटा असतो, त्याची कृतज्ञता म्हणून पितरांचे स्मरण करणे गरजेचे असते. जगाच्या पाठीवरील प्रत्येक धर्मात, संस्कृतीत काही ना काही प्रकारे पूर्वजांचे स्मरण केरण्याची प्रथा आहे ती यासाठी.

फलज्योतिषात राहूवरून पितामह किंवा पितर, पूर्वज पाहतात, पिढीजात शाप पाहतात. धनस्थानापासून घराणे पाहतात. या दोन गोष्टींवरून पितरांकडून आलेला वारसा दिसून येतो. पत्रिकेत राहूचे विशिष्ट योग असतील तर अशावेळी पूर्वजांचा मागोवा घ्यावा लागतो. आजच्या काळात या गोष्टींवर फारसा विश्वास ठेवला जात नाही. मीही ह्या शक्यतांचा विचार शेवटी करत असे परंतु माझ्याकडे आलेल्या काही जातकांच्या अनुभवांनी हा विचार बदलायला लावला. त्यातील काही पुढे देत आहे. शेवटी प्रत्यक्ष ज्ञान तर्कालाही हरवते.

संकेतच्या घरात अचानक आजारपणे, अपघात, भांडणे सुरु झाली. त्यामागचे कारण सापडत नव्हते. त्याच्या पत्रिकेत चतुर्थस्थानी चंद्र राहु युती होती, चंद्र राहु दशेत या युतीवरूनराहूचे गोचर भ्रमण सुरु होते. संकेतला मी त्यावर्षीचे श्राद्ध करण्याचे राहिले आहे का असे विचारले. संकेतच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या घरात श्राद्ध कधीच होत नव्हते, पण दरवर्षी ते पितरांचे स्मरण करून काही रक्कम देणगी म्हणून देत असत ती या वर्षी द्यायची राहिली होती. काही आर्थिक अडचणींमुळे तसे करणे शक्य झाले नव्हते. मी वर म्हणल्याप्रमाणे श्राद्ध याचा अर्थ पितरांचे स्मरण करून केलेले कर्म असा आहे; संकेतच्या पत्रिकेने मला त्या कर्मात पडलेला खंड बिनचूक दाखविला होता. ग्रहदशा आणि गोचर यामुळे हे कर्म राहून गेले की कर्म राहून गेल्याने अशा ग्रहस्थितीमुळे घरात वाईट घटना घडू लागल्या हे सांगणे अवड आहे.

संकेतचा प्रश्न लवकर सुटला. दरवेळी प्रश्न सुटतातच असे नाही. नीरजाबाईंना त्यांच्या नवऱ्याकडून आणि भावाकडून त्रास भोगावा लागत होता, त्यांच्या मुलीचा घटस्फोट होऊ घातला होता. त्यांच्या पत्रिकेत बुध राहु केंद्रयोग आणि त्यांच्या मुलीच्या पत्रिकेत बुध राहु युती होती. बुधाचा दोन्ही ठिकाणी धनस्थानाशी संबंध होता. मी त्यांना त्यांच्या घरात कोणाचा घातपाताने किंवा छळाने मृत्यू झाला आहे का हे विचारले. त्यांना आश्चर्य वाटून त्यांनी त्यांच्या आत्याने घरी होणाऱ्या छळाला कंटाळून जाळून घेतल्याचे सांगितले. बुध तरुण माणूस विशेषत: मुंजा मुलगा (मुंज होऊन लग्न न झालेला) दाखवतो. बुधावरून आत्या दिसत नाही, म्हणजे आत्याचाही छळ झाला तो अशा तरुण मुलाच्या/मुलीच्या मृत्यूचा परिपाक होता. अशावेळी मूळ कळल्याशिवाय उपाय करता येत नाही. सर्वपित्री श्राद्ध करूनही संकट टळत नाही. मी त्यांना अशा घटनेचा शोध घ्यायला सांगितला. परंतु आजवर तो शोध लागलेला नाही, भोगही संपलेले नाहीत.

सानिका आणि तिच्या नवऱ्याच्या दोघांच्या पत्रिकेत मंगळ राहुचे षष्ठ, व्यय स्थानातून योग होते; सानिकाच्या पत्रिकेत मंगळ, राहू प्रतियुती आणि तिच्या नवऱ्याच्या पत्रिकेत मंगळ राहु व्ययातील युती. मंगळ, राहू युती घरातील विधवा स्त्री, विशेषत: जिला घरात चांगली वागणूक मिळालेली नाही अशी, दाखवते. अशी युती जर षष्ठ, व्यय स्थानात असेल तर त्या स्रीच्या तळतळाटातून वाईट फळे मिळतात. पूर्वी घराघरातून अशा स्त्रिया असत, पण सध्याच्या काळात हे अभावाने आढळते. मी सानिकाला ही शक्यता बोलून दाखवली. तिने चौकशी केली असता तिच्या आजेसासूबाईंच्या बाबतीतच असे घडले असल्याचे आढळले. मागच्या अनुभवावरून काही वाईट घटना घडण्याआधीच तिला त्यांच्या स्मरणार्थ श्राद्ध किंवा दान किंवा इतर कर्म करण्यास सांगितले आहे.

शुक्रवार, १० जुलै, २०१५

नात्यातील गैरसमज - ज्योतिषाची मदत

अरविंद (नाव बदलेले आहे) माझ्याकडे त्याच्या मोठ्या बहिणीशी सध्या संबंध नीट नाहीत अशी तक्रार घेऊन आला. त्याच्या म्हणण्याप्रमाणे नक्की काय बिघडले होते हे त्याला कळत नव्हते. त्याने प्रश्न विचारला तेव्हाची पत्रिका मी मांडली (प्रश्नकुंडली १).
प्रश्नकुंडली १: ५ ऑक्टोबर, २०१३, १२:०४, पुणे

प्रश्नकुंडलीत प्रश्न, त्यासंबंधीची सर्व परिस्थिती यांचे प्रतिबिंब असते. मग ती परिस्थिती भूत, वर्तमान किंवा भविष्य या कुठल्याही काळातील असो. मोठे बहिण किंवा भाऊ लाभस्थानावरून पाहतात. चंद्र दशमात म्हणजे लाभाच्या व्ययात त्यामुळे मोठ्या बहिणीशी बिघडलेल्या संबंधाविषयी प्रश्न आहे दिसत होतं. त्याचप्रमाणे अष्टमातला चंद्र मानसिक ताणही दाखवत होता. त्यात चंद्र स्वनक्षत्रात, शुक्राच्या उपनक्षत्रस्वामीमध्ये, शुक्र लाभेश, स्त्रीदर्शक ग्रह, प्रश्नाची सर्व ओळख पटली. आता निदान करायचं होतं.

या कुंडलीत शुक्र, मंगळ केंद्रयोग आहे. शुक्र लाभेश आणि मंगळ पंचमेश, म्हणजे लाभाचा सप्तमेश. लाभस्थान मोठ्या बहिणीचं तर पंचमस्थान तिच्या पतीचं. त्यात ते शुक्र मंगळ म्हणजे विवाहसौख्याशी (की असौख्याशी) संबंधित ग्रह. मी अरविंदला त्याच्या बहिणीचे तिच्या पतीशी संबंध कसे आहेत हे विचारलं. असे नसते अगोचरपणे ज्योतिषाला करावेच लागतात. प्रश्नकुंडलीने दाखविलेल्या शक्यता पडताळूनच उत्तरं मिळतात. आश्चर्यचकित होऊन त्याने मला त्यांचा काही महिन्यांपूर्वी घटस्फोट झाल्याचं सांगितलं. दशमाचा उपनक्षत्रस्वामी राहु स्वनक्षत्रात, लाभात लाभाशी युती करताना दिसला. राहु अशा स्थतीत गैरसमज, मनात दाटलेली काळोखी, जळमटे दाखवितो. मी अरविंदला त्यांच्यात काहीतरी गैरसमज झाल्याचे सांगितले. हे गैरसमज तिच्या वैवाहिक आयुष्यातील दु:खद घडामोडींमुळे आहेत ह्याची कल्पना दिली.

"मग आता काय करू? हे नातं पुन्हा कसं जुळवू?", अरविंदने विचारलं. प्रश्नकुंडली, प्रश्न दाखवते, त्याची पार्श्वभूमी दाखविते, आणि उत्तरंही देते. लाभाचा उपनक्षत्रस्वामी बुध दशमात पडलेला दिसला. तो दशमात असला तरीही लाभाशी होऊ घातलेल्या युतीत होता. बुध वाणी, संवादाचा कारक आहे. मी अरविंदला, स्वत: मागील सर्व गोष्टी विसरून बहिणीशी मोकळेपणाने बोलायला सांगितलं. अरविंदला अशा बोलण्यातून गैरसमज आणखी वाढतील का अशी चिंता पडली होती. मजा अशी की दशमाचा उपनक्षत्रस्वामी लाभातून दशमात चालला होता आणि लाभाचा उपनक्षत्रस्वामी दशमातून लाभात. स्वस्थानी जाणाऱ्या या ग्रहांनी, दोघे बहिण-भाऊ आपले मतभेद विसरून एकत्र येणार, हे मला निसंदिग्धपणे दाखवलं, आणि त्याप्रमाणे ते झालंही!

ग्रहदेखील न बोलता आयुष्यातलं नाट्य किती समर्थपणे दाखवतात? पहायला जरा कवीचं हृदय हवं इतकंच!

शनिवार, २१ मार्च, २०१५

भारत विरुद्ध बांग्लादेश, कोण जिंकेल? प्रश्नकुंडलीतील प्रश्नाचे महत्त्व

ज्योतिष शिकताना महत्वाचा म्हणजे सराव. तो मला घरच्यांकडून आणि मित्रांकडून भरपूर मिळत आलेला आहे. मला वास्तविक क्रिकेटमध्ये फार रस नाही, पण क्रिकेटच्या स्पर्धा सुरु झाल्या (हल्ली त्या वर्षभर चालूच असतात) की हे लोक मला सामन्यांचा निकालाबाबत प्रश्न विचारतात. अशा प्रश्नांमधून ज्योतिषाचे प्राथमिक धडे पक्के होतातच, पण ज्योतिषातील नियमांचे वस्तुनिष्ठ परीक्षण करायला भरपूर वाव मिळतो. त्याचे एक उदाहरण म्हणजे, परवाचा भारत विरुद्ध बांग्लादेश सामना!

एखाद्या सामन्यात इच्छित संघ/खेळाडू जिंकेल का? प्रकारच्या प्रश्नांमध्ये कृष्णमूर्ती ज्योतिषाचे नियम खालीलप्रमाणे आहेत
१. लग्नस्थान हे जो जिंकेल का असा प्रश्न आहे त्याचे आणि सातवे स्थान हे विरोधी संघाचे/माणसाचे धरावे. विरोधी संघ हरतो, म्हणजे त्याचे व्यय स्थान फलित होते, म्हणून हा प्रश्न सहाव्या (सातव्याचे व्ययस्थान) स्थानावरून सोडवतात.
२. प्रश्नकुंडलीत चंद्र सहाव्या स्थानाचा कारक असेल तर ती कुंडली बरोबर उत्तर देते. 
३. इच्छित संघ/माणूस जिंकेल का याचे उत्तर सहाव्या स्थानाचा उपनक्षत्रस्वामी देतो. हा उपनक्षत्रस्वामी जर ६ (सातव्याचे व्ययस्थान) किंवा सहयोगी स्थाने १० (कर्तृत्व स्थान), ११ (लाभ, इच्छापूर्तीचे स्थान) यांचा कारक असेल तर इच्छित संघ जिंकतो, नाही तर हरतो.
४. इतर प्रश्नकुंडलीचे नियम उदा. वक्री ग्रहांचे कारकत्व इथेही लागू होतात.

भारत विरुद्ध बांग्लादेश सामन्यात भारत जिंकेल का हा प्रश्न मला तीन जणांनी वेगवेगळ्या वेळी विचारला. त्या प्रश्नकुंडल्या खाली दिल्या आहेत. त्यांचा क्रमाने विचार करू.

प्रश्नकुंडली १: 18/Mar/2015 16:01:00 पुणे
प्रश्नकुंडली १ मध्ये चंद्र मंगळाच्या धनिष्ठा नक्षत्रात आहे. तो १, ७, ५, ९, १० या स्थानांचा कारक आहे, सहाव्याचा नाही, त्यामुळे ह्या कुंडलीवरून उत्तर देता येणार नाही असे मी सांगितले. सहाव्या स्थानाचा उपनक्षत्रस्वामी रवि, शनिच्या नक्षत्रात असून शनि वक्री आहे, त्यामुळे जर मी उत्तर दिले असते तर भारत हरेल असे द्यावे लागले असते आणि अर्थातच ते चुकले असते.

प्रश्नकुंडली २: 19/Mar/2015 10:41:00, पुणे
प्रश्नकुंडली २ मध्ये चंद्र राहुच्या नक्षत्रात आहे. तो २, ३, ५, १० या स्थानांचा कारक आहे, सहाव्याचा नाही, त्यामुळे ह्या कुंडलीवरून उत्तर देता येणार नाही असे मी सांगितले.  सहाव्या स्थानाचा उपनक्षत्रस्वामी गुरु वक्री, बुधाच्या नक्षत्रात २, ३, ५, ८, १०, ११ या स्थानांचा कारक आहे. तो १०, ११ चा कारक असल्याने भारत जिंकेल असे उत्तर आले असते, पण गुरु मार्गी झाल्यावर, म्हणजे ९ एप्रिलनंतर. सामना कितीही रंगला तरी तो इतके दिवस नक्कीच चालला नसता, त्यामुळे हे उत्तर हास्यास्पद ठरले असते.

प्रश्नकुंडली ३: 19/Mar/2015 08:49:00, पुणे
प्रश्नकुंडली ३ मध्ये चंद्र राहुच्या नक्षत्रात आणि राहु ६ व्या स्थानात, त्यामुळे प्रश्न बरोबर जुळला. सहाव्या स्थानाचा उपनक्षत्रस्वामी राहु बुधाच्या नक्षत्रात ३, ४, ६, ११ या स्थानांचा कारक आहे, त्यामुळे भारत हा सामना जिंकेल असे सांगितले जे उत्तर खरे आले.  या सामन्यात आघाडीच्या फलंदाजांनी ज्या पद्धतीने विकेट फेकल्या आणि बांग्लादेशाच्या फलंदाजांनी ज्या पद्धतीने धावांमध्ये कंजुषी केली, ती राहुला साजेशी होती.






सट्ट्यासाठी या पद्धतीचा उपयोग होत नाही. सट्टेबाज जेव्हा प्रश्न विचारतो, तेव्हा तो प्रश्न ठराविक संघ/खेळाडू जिंकेल का असा न दिसता, सट्टेबाजाला पैसे मिळतील का असा दिसतो. सट्टेबाजाला जर पैसे मिळणार नसतील, तर त्याने सट्टा लावलेला संघ जिंकत नाही. अशा परिस्थितीत मुळात कुंडलीत प्रश्न दिसत नाही, त्यामुळे ज्योतिषी उत्तर देऊ शकत नाही आणि दिलेच तर ते चुकते.

रविवार, १५ मार्च, २०१५

गहाळ सामान: चंद्राचा प्रश्न आणि त्याचेच उत्तर

कुंडली म्हणजे सूर्य पृथ्वीभोवती ज्या वर्तुळातून फिरताना दिसतो, त्या मार्गाची (क्रांतीवृत्ताचा) नकाशा. मजा अशी की चंद्रासकट सगळे ग्रह (ज्योतिषीय अर्थाने) ह्याच वर्तुळाजवळून फिरताना दिसतात. क्रांतीवृत्तावरील तारे पृथ्वीवरून स्थिर दिसतात, त्यामुळे ह्या नकाशात, प्रामुख्याने ग्रहांची स्थिर ताऱ्यांच्या सापेक्ष स्थाने दाखवलेली असतात. जन्मकुंडली, म्हणजे त्या त्या व्यक्तीच्या जन्मवेळचा क्रांतीवृत्ताचा नकाशा. ज्योतिषाला विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर जन्मकुंडलीवरून देणे शक्य असतेच असे नाही. अशावेळी ज्योतषी प्रश्न विचारलेल्या वेळच्या क्रांतीवृत्ताच्या नकाशाचा वापर करतो, त्या नकाशाला प्रश्नकुंडली म्हणतात.

प्रश्नकुंडली: ९ मार्च २०१५ १५:२१, पुणे
चंद्र हा मनाचा कारकग्रह मानला आहे. चंद्राचे कारकत्व प्रश्न विचारायला येणाऱ्याचे मन कुठे आहे हे दाखवते. प्रश्नकुंडलीची मजा अशी की, प्रश्न विचारणाऱ्याने प्रश्नाचा उच्चार जरी केला नाही (तो मनात ठेवला), तरीही प्रश्नकुंडलीवरून ज्योतिषी प्रश्न काय आहे याचा अंदाज लावू शकतो. याचा उपयोग ज्योतषी प्रश्न ताडून पाहण्यासाठी करतात. विचारलेला प्रश्न खरंच तसाच विचारणाऱ्याच्या मनात आहे का हे पहिल्यांदा पाहिले जाते. तसे असेल तर तीच प्रश्नकुंडली प्रश्नाचे उत्तर देण्यासाठीही वापरली जाऊ शकते. थोडक्यात विचारणारा प्रश्न आणि उत्तर बरोबरच घेऊन येत असतो. ज्योतषी फक्त ते उत्तर वाचून दाखवतो. प्रश्नकुंडली ज्योतिषाला नवीन काहीतरी शिकवूनही जाते.

९ मार्च २०१५ रोजी १५:२१ ला मला प्रश्न विचारला तो असा. हे गृहस्थ परदेशी गेले होते. त्यांचे सामान तिकडे दोन दिवस झाले तरीही पोचले नाही. दुसऱ्या दिवशी हे गृहस्थ दुसऱ्या शहरात जाणार होते. तिथे असेपर्यंत सामान मिळेल का? सामानात सर्व परकीय चलन, खाण्याचे पदार्थ (शाकाहारी लोकांसाठी जपान, युरोपातील काही देशात जायचे असेल तर गरजेचे), कपडे सगळेच होते. त्यामुळे चांगलीच गैरसोय होत असणार. त्यावेळची प्रश्नकुंडली(टीपा पहा) दिली आहे.

या कुंडलीत चंद्र षष्ठस्थानात, तृतीयेश, चतुर्थेश, आणि त्याचा नक्षत्रस्वामी मंगळ लाभात, सप्तमेश, व्ययेश. म्हणजे चंद्र हा ३, ४, ६, ११, १२ या स्थानांचा कारक आहे. यातील ३, १२ एकत्र ही स्थाने प्रवास विशेषत: परदेशप्रवास दाखवतात. ११ हे स्थान काहीतरी मिळवण्यासंबंधीचा प्रश्न दाखवते. ४ ह्या स्थानाने एकूण सामान दाखवले. पण ६ व्या स्थानाचा संदर्भ मला लागेना. एखादी गोष्ट मिळेल का, ह्यासाठी ११ व्या स्थानाचा उपनक्षत्रस्वामी त्या गोष्टीसंबंधी स्थानाचा कारक असावा लागतो. ह्या कुंडलीला लाभाचा उपनक्षत्रस्वामी शुक्र १, ६, ११ (शुक्राचा नक्षत्रस्वामी बुध) २, १० या स्थानांचा कारक आहे. तो ४ चा कारक नाही, म्हणून सामान मिळणार नाही असे उत्तर द्यावे का अशा विचारात मी असताना, चंद्र ६ व्या स्थानात आहे आणि लाभाचा उपनक्षत्रस्वामीही ६ चा कारक आहे, हे विशेष वाटले. सातवे स्थान एखाद्या बाबतीतील सहयोगी दाखवते. या प्रश्नात विमानप्रवास ही बाब धरली तर सहयोगी म्हणजे विमानकंपनी. ६ हे ७ व्याचे व्यय (आधीचे) स्थान, विमानकंपनीच्या ताब्यातून सुटणाऱ्या गोष्टी दाखवते. इथे हरवलेले सामान मिळवणे ही समस्या नाही, तर विमानकंपनीकडून ते मिळेल का हा प्रश्न असल्याने सामानाच्या कारक स्थानापेक्षा ६ वे स्थानच महत्त्वाचे आहे, हे चंद्राच्या स्थानाने माझ्या लक्षात आले. ह्या तर्काला पुस्तकी आधार नसल्याने मी साशंक मनाने, सामान मिळेल असे सांगितले. चंद्र मंगळाच्या नक्षत्रात आणि मंगळ लाभात असल्याने दिवस संपायच्या आत मिळेल असेही सांगितले. खरोखरीच त्या दिवशी हे गृहस्थ दिवसभराची कामे आटपून त्यांच्या हॉटेलवर जायच्या आत विमानकंपनीने ते तिथे पोचवले होते. चंद्रानेच प्रश्न टाकला आणि त्यानेच उत्तरही दिले. प्रश्न आणि उत्तर शेजारी असतात ते असे.

टीप: हा प्रश्न मला सासऱ्यांनी ज्येष्ठ जावयाबद्दल विचारला असल्याने, पंचमाचे सप्तम स्थान लग्नी ठेवून काढलेली कुंडली दिली आहे.

रविवार, १६ नोव्हेंबर, २०१४

घर घेता येईल का?

नोकरी, धंद्याच्या निमित्ताने आपले गाव/शहर सोडून परक्या शहरात, राज्यात किंवा अगदी परदेशात जाणे ही खूप नित्याची गोष्ट झाली आहे. आपले राहते घर सोडून परक्या मुलखात नोकरी करताना कधी ना कधी तरी तेथे घर घेणे गरजेचे होते. कर्जाच्या सुलभतेमुळे तरुण वयात स्वत:चे घर घेणे शक्यही होते. परंतु पैशाची सोबत असूनही बरेच शोधून मनासारखे घर मिळतेच असे नाही. अशावेळी कुठे तडजोड करावी का, का वाट पहावी अशा द्विधा मन:स्थितीत ज्योतिषाची मदत होते.

रोहिणीला (नाव बदलले आहे) बरीच शोधाशोध केल्यावर एक घर पसंत पडले होते. पैशाची सोबत होती. अर्थात अशा घर घेऊ इच्छिणारेही पुष्कळ होते. तिने मला हे घर तिला घेता येईल का, हा प्रश्न ५ जानेवारी २०१४ रोजी रात्री ९:४७ ला केला.  त्यावेळची पुण्याची (मी जिथे तो प्रश्न सोडवला) कुंडली खाली दिली आहे.

प्रश्नकुंडली: ५/जाने/२०१४ २१:४७, पुणे
चंद्र गुरुच्या नक्षत्रात आणि गुरु लाभात म्हणजे मनातील इच्छा पूर्ण होणार का हा प्रश्न होता, पण त्याचे घराशी असलेले नाते चतुर्थाच्या उपनक्षत्रस्वामी असलेल्या चंद्राने स्पष्ट केले. प्रश्नकुंडलीची ही मजा आहे, की प्रश्नकर्त्याने जरी प्रश्न विचारला नाही तरी ज्योतिषाला तो प्रश्नकुडलीद्वारे बरोबर कळतो.

कृष्णमूर्ती ज्योतिषात हो/नाही प्रकारचे उत्तर पाहताना, त्या भावाचा उपनक्षत्रस्वामी पाहतात. हा उपनक्षत्रस्वामी आणि त्याचा उपनक्षत्रस्वामी मार्गी असून जर पूरक भावांचे कारक असतील तर हो असे उत्तर असते. या कुंडलीला चतुर्थाचा उपनक्षत्रस्वामी चंद्र वक्री गुरुच्या नक्षत्रात आहे. त्यामुळे रोहिणीला मी तुला हे घर घेता येणार नाही असे सांगितले. लाभाचा उपनक्षत्रस्वामी शनी तृतीयात आहे; तृतीयस्थान हे चतुर्थाचे व्ययस्थान. इच्छापूर्तीचे स्थान घराला नकार देत आहे म्हणजे रोहिणीचीच हे घर घ्यायची इच्छा होणार नाही. यापुढचे संवाद असे -
"तुला स्वत:लाच घर घेण्याची इच्छा होणार नाही", मी.
"मला ते घर पसंत आहे असे सांगुनही तू हे सांगतोस?", रोहिणी.
"हो, माझ्यासमोरची पत्रिकाच तसे सांगते आहे. तू तुझे प्रयत्न कर", मी.
रोहिणीला फार प्रयत्नाने पसंत पडलेले घर आपल्याला मिळणार नाही ह्याचे दु:ख होतेच. ज्योतिषाला सत्याचे कडू औषध पाजून प्रश्नकर्त्याला आगाऊ सूचना द्यावी लागते.

रोहिणीने हे घर घ्यायचा प्रस्ताव घरमालकासमोर १४ जानेवारी रोजी ठेवला आणि कर्जासाठी बोलणी सुरु केली. तिच्या कर्ज सल्लागाराने तिला १४ जानेवारी रोजी ह्या घरासाठी कर्ज घेण्यात अडचणी येतील त्यामुळे हे घर घेऊ नये असा सल्ला दिला. रोहिणीने तत्परतेने तासाभरात स्वत:हून प्रस्ताव मागे घेतला.

असे प्रश्नकर्ते मला आवडतात. ज्योतिष प्रयत्न करु नका असे कधीच सांगत नाही, उलट प्रयत्नांना योग्य काळ आणि दिशा देण्याचे काम करते. त्याचबरोबर प्रयत्नांना अपयश आले तर त्यांची कारणमीमांसा करून निराश न होण्यास मदत करते. रोहिणीला घर मिळणार नाही याची कल्पना आधीच आल्याने, तिने प्रस्ताव मागे घेतानाच पुढचे घर पहायची तयारी केली. तिने ग्रहांचा कौल पाहून तो प्रस्तावच पुढे ठेवला नसता तर तिला पसंत पडलेले घर  केवळ ज्योतिषाच्या सांगण्यावरून सोडले ही गोष्ट खात राहिली असती, आणि तसे व्हायला कारणीभूत मी झालो म्हणून मलाही!

तिच्या जन्मकुंडलीवरून मी तिला जून २०१४ ते सप्टेंबर २०१४ ह्या काळात घर घेता येईल असे सांगितले, अर्थात जन्मकुंडलीवरून निश्चित केलेल्या काळात जन्मवेळेतील फरकाप्रमाणे २-३ महिन्यांचासुद्धा फरक येऊ शकतो याची कल्पना देऊन प्रयत्न तसेच चालू ठेवण्यास सांगितले. एप्रिल २०१४ च्या सुमारास तिने दुसऱ्या घराचा व्यवहार पूर्ण केला, घरातील दुरुस्ती आणि बदल होऊन रुळण्यास जून २०१४ उजाडले.

रोहिणीची घर घेण्याची इच्छा जशी पूर्ण झाली तशी सर्व गृहेच्छुकांची होवो!
गृहचतुर्थाची कहाणी लाभोत्तरी सुफळ संपूर्ण!

गुरुवार, २ ऑक्टोबर, २०१४

संततियोग प्रयोग आणि संशोधन

फलज्योतिषात अनेक पद्धती प्रचलित आहेत. ह्या प्रत्येक पद्धतीत अनेक नियम आहेत, त्यातले काही परस्परविरोधीही आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे,  ह्यातल्या कित्येक (जवळजवळ सगळ्याच) नियमांना सिद्धांताची जोड दिसत नाही. एखादा नियम तसा का आहे, याचं विवेचन फारसे आढळत नाही. किंबहुना त्यामुळेच ज्योतिषाला अवैज्ञानिक शास्त्र म्हणवले जाते. यातले बरेच नियम लागू पडताना दिसतात आणि बरेच नाही. हा नीरक्षीर विवेक कसा करायचा हा मोठा प्रश्न आहे. त्याचे सोपे परंतु कष्टप्रद उत्तर म्हणजे, प्रत्यक्ष निरीक्षणांशी ज्या नियमांचा मेळ बसतो ते नियम स्वीकारणे आणि उरलेले सोडून देणे. आम्ही "प्रथम संतति कधी होते?" हा प्रश्न घेऊन हे प्रयोग सुरु केले.

या लेखात वापरलेल्या ज्योतिषीय संकल्पना समजण्यासाठी संदर्भपृष्ठांचा वापर करावा.

पद्धत

हातात असलेला वेळ आणि उपलब्ध साधने याचा विचार करता कुठल्यातरी एकाच पद्धतीचा उपयोग करणे शक्य होते. कृष्णमूर्ती ज्योतिष  पद्धतीचा सोपेपणा आणि अचूकता ह्या दोन गोष्टींचा विचार करून त्या पद्धतीनुसार प्रयोग सुरु केले. ह्या नियमांना सैद्धांतिक बैठक नसल्यामुळे, त्यांची गुणवत्ता मोजण्यासाठी Statistical Hypothesis Testing चा वापर केला. ह्या पद्धतीत एखादे गृहितक निव्वळ शक्यतेमुळे (Random Chance) खरे वाटत नाही ना हे तपासले जाते.

सध्या कृष्णमूर्ती पद्धतीची वेगवेगळी संस्करणे वापरली जातात. आम्ही कृष्णमूर्तींच्या Readers मधील खालील नियम वापरले. विशेषत: राहु, केतू यांचे ग्रहांच्या दृष्टी आणि योगांमुळे बदलणारे कारकत्त्व तसेच ग्रहांचे दृष्टी आणि योगांनी बदलणारे कारकत्त्व विचारात घेतले नाही.
  1. ग्रह त्याच्या (विंशोत्तरी) दशांमध्ये त्याच्या कारकभावांसंबंधी फळे देतो.
  2. ग्रहाचे कारकभाव पुढीलप्रमाणे
    1. ग्रह जिथे आहे ते भाव
    2. ग्रह ज्या भावांचा स्वामी आहे ते भाव
    3. ग्रहाचा नक्षत्रस्वामी जिथे आहे आणि तो ज्या भावांचा स्वामी आहे ते भाव
  3. या फळांची अनुकूलता उपनक्षत्रस्वामीवरून ठरते. उपनक्षत्रस्वामीचे कारकत्त्व वरील नियमाप्रमाणे मानावे.
  4. राहु आणि केतू त्यांच्या राशीस्वामी जिथे आहे आणि ज्या भावांचा स्वामी आहे त्या भावांचे कारक होतात.
कृष्णमूर्ती पद्धतीनुसार प्रथमसंततिच्या वेळी कुटुंबात वाढ होते, जातकाला तसेच त्याच्या जोडीदाराला पहिले अपत्य मिळते. त्यामुळे या वेळी धन, पंचम आणि लाभ या भावांच्या कारक ग्रहांच्या दशा चालू असतात.

निरीक्षणे

२०० पालक आणि त्यांच्या पहिल्या संतति यांच्या जन्मवेळा, जन्मस्थळे यांच्या माहितीवरुन त्यांच्या कुंडल्यांचा अभ्यास करून केलेली निरीक्षणे पुढीलप्रमाणे
  1. ८५% पालकांच्या बाबतीत प्रथमसंततिच्या वेळी पंचमभावच्या कारक ग्रहांच्या दशा (महा, अंत:, वि) चालू होत्या. वरील नियमांनुसार ठराविक वेळी एखाद्या भावाच्या कारक ग्रहाची दशा चालू असण्याची निव्वळ शक्यता (Probability) ७०% असते. म्हणजेच प्रथम संतति आणि पंचमभावाच्या कारक ग्रहाची दशा याचा संबंध निव्वळ शक्यतेपेक्षा जास्त आहे.
  2. धन आणि लाभ भावांबाबत मात्र हे प्रमाण कमी दिसून आले. विशेषत: वडिलांच्या बाबतीत या भावांचे प्रमाण निव्वळ शक्यतेइतकेच होते. आयांच्या बाबतीत धन भावाचे प्रमाण पंचम भावाच्या खालोखाल दिसून आले. लाभस्थानाचे प्रमाण मात्र निव्वळ शक्यतेइतकेच दिसले. म्हणजेच, आयांच्या बाबतीत धन भावाचा आणि प्रथम संततिचा संबंध दिसला, पण वडिलांच्या बाबतीत तसा तो दिसला नाही, किंबहुना पंचमभाव सोडता तो तसा कुठल्याच भावासंबंधी दिसत नाही.
सुरुवातीला म्हणल्याप्रमाणे पुस्तकातील सर्व नियम जसेच्या तसे लागू होताना दिसत नाहीत. पण लागू होणारे नियम या पद्धतीने वेगळे करता येतात. उदा. संततिसाठी पंचमभाव पहावा किंवा कुटुंबस्थानासाठी धनभाव पहावा, हे नियम पुस्तकांत मिळतात, परंतु "तसे का?" याचा विचार पुस्तकांत होताना दिसत नाही. या प्रयोगातून ते सांख्यिकीदृष्ट्या सिद्ध करणे शक्य आहे.

त्याबरोबरच ग्रहदशा, गोचर याबरोबरीने इतर कुठले घटक यावर परिणाम करतात का याचाही शोध या पद्धतीने घेता येइल. संगणकातील प्रगतीमुळे, खूप मोठ्या प्रमाणात माहितीचे विश्लेषण करणे शक्य आहे. आम्ही हाच प्रयोग मोठ्या प्रमाणावर करत आहोत. त्यासाठी सांख्यिकीच्या नियमांनुसार १००० पालक आणि त्यांच्या पहिल्या संततिच्या जन्मवेळा आणि जन्मस्थळे गोळा करत आहोत. याचा उपयोग आणखी सूक्ष्म आणि अचूक नियम मिळवण्यासाठी होइल.

आपण आपली माहिती देण्यास उत्सुक असाल तर ह्या Google Form चा वापर करा.

शनिवार, २३ ऑगस्ट, २०१४

डॉ. दाभोळकरांचे मारेकरी सापडतील का?

मागील लेखांमध्ये आपण वस्तू कशा शोधायच्या हे पाहिले. तेच नियम व्यक्ती शोधण्यासही लागू होतात, फक्त त्या लेखात म्हटल्याप्रमाणे राशी आणि ग्रहांचे कारकत्व व्यक्तीनुसार योजावे लागते. उदाहरणार्थ, प्रश्नकुंडलीत चंद्र जर वृश्चिक राशीत असेल तर दरी किंवा निदान माणूस मावू शकेल इतकी मोठी घळ असली पाहिजे, चंद्राबरोबर बुध असेल तर हरवलेल्या व्यक्तीबरोबर एखादे लहान मूल किंवा प्रश्नकर्त्याच्या अाजोळची व्यक्ती असण्याची शक्यता असू शकते. व्यक्तीच्या बाबतीत वृश्चिकेसाठी छोटी सापट अाणि बुधासाठी पुस्तक योजणे बरोबर नाही.

एक वर्षापूर्वी डॉ. दाभोळकरांच्या हत्येने पुण्यात मोठी खळबळ उडवली होती. तेव्हा माझ्या एका ओळखीच्या व्यक्तीने मला मारेकरी मिळतील का, कुठे मिळतील? असा प्रश्न केला काळजीतून केला होता. या व्यक्तीचा दाभोळकरांशी, त्यांच्या कार्याशी अथवा पोलिसांशी काहीही संबंध नव्हता अाणि अाजही नाही. सकृतदर्शनी केवळ विचार पटले नाहीत किंवा विचारांच्या पातळीवर विरोध होता, म्हणून कोणाची हत्या, तीही पुण्यात होईल हे धक्कादायक होते. सामान्य लोकांना अापल्या जिवाची काळजी न वाटती तर नवलच. निदान असे प्रकार पुढे न होण्यासाठी तरी मारेकरी सापडावेत, हत्येचा हेतू कळावा असे वाटले तर नवल नाही.

या प्रश्नाची भावचलित कुंडली पुढीलप्रमाणे,

प्रश्नकुंडली: १ सप्टेंबर २०१३, १८:०९, पुणे
चंद्र नवमस्थानी कर्क राशीत, पुनर्वसू नक्षत्रात, कर्क नवमांशात चंद्राच्या उपनक्षत्रात अाहे. तिथे त्याबरोबर मंगळ अाणि गुरु अाहेत. चंद्राचा भाव, रास अाणि त्याच्याशी संबंधित ग्रह यातून मारेकऱ्याचे प्रश्न विचारण्याच्या वेळचे स्थान अाणि तेव्हा त्याच्याबरोबर असलेल्या व्यक्ती यांच्याबद्दलचे निष्कर्ष धक्कादायक असल्याने तो कुठे अाहे हे सांगणे मी टाळले. इथेही मी ते लिहित नाही. सूज्ञ वाचक संदर्भपृष्ठांचा वापर करून ते ओळखतीलच! पण ते पाहिल्यावर मी हे मारेकरी मिळणार नाहीत, असे सांगितले. अाज वर्ष होत अाले तरीही ते मिळालेले नाहीत हे सर्वज्ञात आहे.

डॉक्टरांनी केलेलं कार्य खूप मोठं आणि आजच्या काळात गरजेचंही (अगदी ह्या ब्लॉगच्या विषयाला सकृतीदर्शनी विरोधी असलं तरीही). ह्या लेखाच्या निमित्ताने त्यांच्या पहिल्या पुण्यतिथीला त्यांच्या कार्याला आणि स्मृतीला नम्र श्रद्धांजली!

रविवार, ३ ऑगस्ट, २०१४

हरवलेल्या वस्तूंचा शोध

फलज्योतिषाचा सर्वात सोपा आणि खूप वेळा करावा लागणारा उपयोग म्हणजे हरवलेल्या वस्तू शोधणे. निदान आपल्या हरवलेल्या वस्तू शोधण्यासाठी तरी ज्योतिषाचा अभ्यास जरूर करावा. बऱ्याचदा एखादी वस्तू डाव्या-उजव्या हाताने किंवा पुन्हा लागली तर "सापडायला सोप्या" अशा विवक्षित ठिकाणी आपण ठेवतो, नंतर जेव्हा त्या वस्तूची अत्यंत गरज असते तेव्हा ती विवक्षित जागाच "सापडत" नाही; ऐन मोक्याच्या वेळी आपली स्मरणशक्ती दगा देते. वस्तू हरवल्या किंवा सापडत नसल्या की कुठे शोधायला सुरुवात करावी इथपासून सुरुवात असते. अशा वेळी, अगदी लहान वाटणारी आपली खोलीदेखील, जगाएवढी भासायला लागते. जर घरात ज्योतिषाची प्राथमिक माहिती असलेली व्यक्ती असेल तर निदान ती वस्तू कुठे असेल, याचा सुगावा ती व्यक्ती देऊ शकते.

पद्धत

हरवलेल्या वस्तू सापडवण्याच्या अनेक पद्धती ज्योतिषात आहेत, त्यापैकी माझ्या दृष्टीने सोपी आणि जास्त बरोबर उत्तरे देणारी पद्धत येथे देत आहे.

ज्योतिषाला जेव्हा अमूक वस्तू कुठे सापडेल, असा प्रश्न केला जातो, तेव्हा त्या वेळची, ज्योतिषी जिथे असेल त्या स्थळाची कुंडली मांडून, त्या कुंडलीतील चंद्राच्या स्थानावरून, हरवलेली वस्तू कुठे असेल त्याचा अंदाज बांधावा. हा अंदाज बांधताना, चंद्राच्या स्थानाचा खालीलप्रमाणे उपयोग करावा - 
  1. चंद्राचे कारकत्त्व - ही प्रश्नकुंडली असल्याने, चंद्र हा हरवलेल्या वस्तूशी संबंधित भावाचा कारक असावा लागतो. उदा. सोन्याचे दागिने हरवल्यास धनभाव, मंगळसूत्र हरवल्यास अष्टमभाव, कागदपत्रे हरवल्यास तृतीयभाव इ. त्यामुळे बऱ्याचदा कर्क रास किंवा चंद्र स्वत: त्या वस्तूशी संबंधित भावात दिसतो. तसा तो कारक नसल्यास, ही कुंडली हरवलेल्या वस्तूची जागा सुचवण्यास उपयोगी नसते.
  2. चंद्राचा भाव - चंद्र ज्या भावात असेल त्या भावानुसार वस्तूचे ठिकाण योजावे. उदा. पंचमभावात असेल तर स्वत:च्या मुलांकडे किंवा खेळणी ठेवायच्या जागी, व्ययात असेल तर झोपायच्या खोलीत वगैरे. भावानुसार जागा कशा योजाव्यात ह्याची माहिती इथे पहा.
  3. चंद्राची रास - भावाप्रमाणेच रासही वस्तूचे ठिकाण सुचवते. रास आणि भाव या दोन्ही गोष्टींचा विचार तारतम्याने करावा लागतो. त्याचबरोबर रास आणि चंद्राचे नक्षत्र ती वस्तू जर एखाद्या वेष्टनात, पिशवीत किंवा पेटीत असेल तर त्या वेष्टनाचा रंगही दाखवते. राशीनुसार जागा कशा योजाव्यात हे इथे पहा. उदा. चंद्र मीन राशीत व्ययभावात असेल तर रास अाणि भाव दोन्ही झोपण्याची जागा दाखवतात. अशावेळी, झोपण्याच्या खोलीत, हिरव्या रंगाच्या पिशवीत किंवा पाण्याच्या भांड्याशेजारी वस्तू असण्याची शक्यता असते.
  4. चंद्राचे नक्षत्र - राशीप्रमाणे नक्षत्र वस्तूच्या आच्छादनाचा रंग दाखवते. तसेच कधी ते वस्तूशी संबंधित व्यक्ती दाखवते. चंद्र ज्या नक्षत्रात अाहे, त्याच्या स्वामीनुसार रंग किंवा व्यक्तीची योजना असते.
  5. चंद्राचा नवमांश - चंद्र ज्या नवमांशात आहे, त्याचा उपयोग रास आणि भावाने दाखवलेली जागा अधिक सूक्ष्म करण्यास करावा. त्याची योजना राशीच्या कारकत्वाप्रमाणेच करावी.
  6. चंद्राबरोबर किंवा त्याच्याशी योग करणारे ग्रह - ग्रह साधारणपणे हरवलेली वस्तू ज्या जागी आहे, त्याच्या आसपासच्या इतर वस्तू दाखवतात. प्रत्येक ग्रहाच्या कारकत्त्वानुसार आणि रंगानुसार या वस्तू योजाव्यात. ग्रहांचे कारकत्व आणि रंग इथे पहा.
या सहा गोष्टींचा एकमेकांशी तारतम्याने संबंध लावून वस्तू कुठे सापडेल याबद्दल अनुमान काढता येते. उदा. चंद्र वृश्चिकेत असेल तर वस्तू किती मोठी‌ आहे यावरून ती अडकलेली फट किती‌ मोठी‌ असेल हा अंदाज येईल, किंवा ती‌ कुठल्या पेटीत किंवा वेष्टनात असेल ते पाहता येईल.
पुढील तक्त्यात काही हरवलेल्या वस्तू कुठे सापडल्या आणि त्यासंबंधी प्रश्नकुंडलीत चंद्राचे स्थान काय होते त्याची उदाहरणे दिली आहेत.

या पद्धतीचे यशापयश

माझ्याकडे असलेल्या एकूण २३ हरवून नंतर सापडलेल्या वस्तूंबाबतच्या प्रश्नकुंडल्या आहेत; पैकी १२ वेळा वस्तू वर सांगितल्याप्रमाणे सापडल्या आहेत. ही संख्या ह्या पद्धतीची परिणामकारकता अधोरेखित करण्यास पुरेशी आहे.

ह्या लेखात वस्तू मिळेल का ह्या प्रश्नाचे उत्तर कसे द्यावे ह्यासंबंधी माहिती नाही. ती माहिती पुऩ्हा कधीतरी लिहीन.

उदाहरणे


प्रश्न विचारण्याची वेळ, स्थळ चंद्राचे स्थान चंद्राचे ग्रहांशी योग वस्तू सापडलेली जागा
भाव रास नक्षत्र नवमांश
27/Jun/2012 21:29:00, पुणे अष्टम कन्या हस्त मिथुन मंगळ, शनि जमिनीलगतचे (कन्या) पुस्तकांचे कपाट (मिथुन), लाल (मंगळ) आणि काळ्या (शनि) रंगाच्या वस्तूंच्या मधल्या सापटीत (अष्टम)
22/Mar/2012 19:32:00, पुणे षष्ठ मीन .भा. कन्या रवि, बुध झोपायच्या खोलीत (मीन रास), जमिनीलगतच्या कपाटात (कन्या नवमांश), इतर कागदपत्रांबरोबर (बुध) ज्यात सरकारी कागदपत्रं (रवि)‌ होती
14/Apr/2014 10:14:00, पुणे चतुर्थ कन्या हस्त मिथुन मंगळ, गुरु कपाटात औषधांच्या डब्याजवळ (कन्या), पांढऱ्या रंगाच्या (हस्त) पिशवीत, लाल पिशवीजवळ (मंगळ), रिकाम्या कप्प्यात (मिथुन) दासबोध (गुरु) असलेल्या खोलीत
3/Jul/2013 19:44:00, पुणे व्यय मेष अश्विनी मिथुन शनि, बुध, रवि, केतू झोपायच्या खोलीत (व्यय), छताजवळ (मेष), लाल रंगाच्या पेटीत, काळ्या (शनि), केशरी (केतू) पिशव्यांबरोबर, औषधांबरोबर (रवि, बुध)