रविवार, १६ नोव्हेंबर, २०१४

घर घेता येईल का?

नोकरी, धंद्याच्या निमित्ताने आपले गाव/शहर सोडून परक्या शहरात, राज्यात किंवा अगदी परदेशात जाणे ही खूप नित्याची गोष्ट झाली आहे. आपले राहते घर सोडून परक्या मुलखात नोकरी करताना कधी ना कधी तरी तेथे घर घेणे गरजेचे होते. कर्जाच्या सुलभतेमुळे तरुण वयात स्वत:चे घर घेणे शक्यही होते. परंतु पैशाची सोबत असूनही बरेच शोधून मनासारखे घर मिळतेच असे नाही. अशावेळी कुठे तडजोड करावी का, का वाट पहावी अशा द्विधा मन:स्थितीत ज्योतिषाची मदत होते.

रोहिणीला (नाव बदलले आहे) बरीच शोधाशोध केल्यावर एक घर पसंत पडले होते. पैशाची सोबत होती. अर्थात अशा घर घेऊ इच्छिणारेही पुष्कळ होते. तिने मला हे घर तिला घेता येईल का, हा प्रश्न ५ जानेवारी २०१४ रोजी रात्री ९:४७ ला केला.  त्यावेळची पुण्याची (मी जिथे तो प्रश्न सोडवला) कुंडली खाली दिली आहे.

प्रश्नकुंडली: ५/जाने/२०१४ २१:४७, पुणे
चंद्र गुरुच्या नक्षत्रात आणि गुरु लाभात म्हणजे मनातील इच्छा पूर्ण होणार का हा प्रश्न होता, पण त्याचे घराशी असलेले नाते चतुर्थाच्या उपनक्षत्रस्वामी असलेल्या चंद्राने स्पष्ट केले. प्रश्नकुंडलीची ही मजा आहे, की प्रश्नकर्त्याने जरी प्रश्न विचारला नाही तरी ज्योतिषाला तो प्रश्नकुडलीद्वारे बरोबर कळतो.

कृष्णमूर्ती ज्योतिषात हो/नाही प्रकारचे उत्तर पाहताना, त्या भावाचा उपनक्षत्रस्वामी पाहतात. हा उपनक्षत्रस्वामी आणि त्याचा उपनक्षत्रस्वामी मार्गी असून जर पूरक भावांचे कारक असतील तर हो असे उत्तर असते. या कुंडलीला चतुर्थाचा उपनक्षत्रस्वामी चंद्र वक्री गुरुच्या नक्षत्रात आहे. त्यामुळे रोहिणीला मी तुला हे घर घेता येणार नाही असे सांगितले. लाभाचा उपनक्षत्रस्वामी शनी तृतीयात आहे; तृतीयस्थान हे चतुर्थाचे व्ययस्थान. इच्छापूर्तीचे स्थान घराला नकार देत आहे म्हणजे रोहिणीचीच हे घर घ्यायची इच्छा होणार नाही. यापुढचे संवाद असे -
"तुला स्वत:लाच घर घेण्याची इच्छा होणार नाही", मी.
"मला ते घर पसंत आहे असे सांगुनही तू हे सांगतोस?", रोहिणी.
"हो, माझ्यासमोरची पत्रिकाच तसे सांगते आहे. तू तुझे प्रयत्न कर", मी.
रोहिणीला फार प्रयत्नाने पसंत पडलेले घर आपल्याला मिळणार नाही ह्याचे दु:ख होतेच. ज्योतिषाला सत्याचे कडू औषध पाजून प्रश्नकर्त्याला आगाऊ सूचना द्यावी लागते.

रोहिणीने हे घर घ्यायचा प्रस्ताव घरमालकासमोर १४ जानेवारी रोजी ठेवला आणि कर्जासाठी बोलणी सुरु केली. तिच्या कर्ज सल्लागाराने तिला १४ जानेवारी रोजी ह्या घरासाठी कर्ज घेण्यात अडचणी येतील त्यामुळे हे घर घेऊ नये असा सल्ला दिला. रोहिणीने तत्परतेने तासाभरात स्वत:हून प्रस्ताव मागे घेतला.

असे प्रश्नकर्ते मला आवडतात. ज्योतिष प्रयत्न करु नका असे कधीच सांगत नाही, उलट प्रयत्नांना योग्य काळ आणि दिशा देण्याचे काम करते. त्याचबरोबर प्रयत्नांना अपयश आले तर त्यांची कारणमीमांसा करून निराश न होण्यास मदत करते. रोहिणीला घर मिळणार नाही याची कल्पना आधीच आल्याने, तिने प्रस्ताव मागे घेतानाच पुढचे घर पहायची तयारी केली. तिने ग्रहांचा कौल पाहून तो प्रस्तावच पुढे ठेवला नसता तर तिला पसंत पडलेले घर  केवळ ज्योतिषाच्या सांगण्यावरून सोडले ही गोष्ट खात राहिली असती, आणि तसे व्हायला कारणीभूत मी झालो म्हणून मलाही!

तिच्या जन्मकुंडलीवरून मी तिला जून २०१४ ते सप्टेंबर २०१४ ह्या काळात घर घेता येईल असे सांगितले, अर्थात जन्मकुंडलीवरून निश्चित केलेल्या काळात जन्मवेळेतील फरकाप्रमाणे २-३ महिन्यांचासुद्धा फरक येऊ शकतो याची कल्पना देऊन प्रयत्न तसेच चालू ठेवण्यास सांगितले. एप्रिल २०१४ च्या सुमारास तिने दुसऱ्या घराचा व्यवहार पूर्ण केला, घरातील दुरुस्ती आणि बदल होऊन रुळण्यास जून २०१४ उजाडले.

रोहिणीची घर घेण्याची इच्छा जशी पूर्ण झाली तशी सर्व गृहेच्छुकांची होवो!
गृहचतुर्थाची कहाणी लाभोत्तरी सुफळ संपूर्ण!