शनिवार, १५ ऑक्टोबर, २०१६

दुभंगलेले सण

अश्विनी पौर्णिमेला मोठ्या मुलाला (आणि आजच्या काळात मुलीला) ओवाळून काहीतरी कपडा, साधारणपणे पांढरा, देण्याची पद्धत बऱ्याच मराठी कुटंबांमध्ये आहे. “अश्विनी आज करू का उद्या?”, असा प्रश्न या वर्षी कोजागिरीला बऱ्याच जणांनी विचारला. नेहमी एकाच दिवशी येणारे हे सण यावर्षी दोन लागोपाठच्या दिवशी आले आहेत. २०१६-१७ च्या पंचांगात, कालनिर्णयमध्ये, कोजागरी पौर्णिमा १६ ऑक्टोबरला आणि अश्विनी पौर्णिमा १७ तारखेला लिहिली आहे. त्यामुळे हा गोंधळ होणे स्वाभाविक आहे. विशेषत: २०१६ या वर्षी नेहमी एकाच दिवशी येणारे अनेक सण दोन लागोपाठच्या दिवशी आले आहेत - नारळी पौर्णिमा १७ ऑगस्टला तर राखीपौर्णिमा १८ ऑगस्टला, नवरात्री/सरस्वती विसर्जन १० ऑक्टोबरला तर दसरा ११ ऑक्टोबरला. असं का? हा प्रश्न चिकित्सक मनाला पडणं साहजिक आहे; त्याचं उत्तर देण्यासाठी हा लेखप्रपंच!

हिंदू सण हे सूर्यचंद्रांच्या आकाशातील स्तिथीवर आधारित आहेत. ही स्थिती सूर्याच्या स्थितीवरून ठरणारा महिना (मास) आणि चंद्राचे त्याच्यापासूनचे अंतर दाखविणारी तिथी यांच्यावरून पाहतात. चंद्राचे सूर्यापासूनचे कोनीय अंतर ० अंशांपासून १८० अंशांपर्यंत आणि नंतर ३६० अंशापर्यंत रोज बदलत जाते. ते ० (किंवा ३६०) अंश असते तेव्हा अमावास्या असते आणि १८० अंश असते तेव्हा पौर्णिमा. हे अंतर एकूण ३० भागांमध्ये विभागले तर प्रत्येक १२ अंशाच्या भागाला एक तिथी म्हणतात. प्रत्येक सणाची तिथी आणि मास ठरलेला आहे. उदा. कोजागिरी पौर्णिमा अश्विन महिन्यातील पौर्णिमेला साजरी करतात, राखीपौर्णिमा श्रावणातील पौर्णिमेला साजरी करतात वगैरे. साधारणपणे चंद्राच्या गतीमुळे एक तिथी जवळजवळ एक दिवस म्हणजे २४ तास चालते, परंतु हा काळ सूर्यचंद्रांच्या स्थितीनुसार बदलतो, त्यामुळे कधी कधी तिथी २४ तासांपेक्षा जास्त तर कधी २४ तासांपेक्षा कमी काळ राहते. या फरकामुळे, दर सूर्योदयाला तिथी बदलत नाही तर ती दिवसात कधीही बदलते. त्यामुळे पंचांगात किंवा दिनदर्शिकेत प्रत्येक तिथीची समाप्तीची किंवा सुरु होण्याची वेळ, सूर्योदयापेक्षा वेगळी आढळून येते.

याबरोबरीने दुसरी एक महत्त्वाची बाब पहावी लागते; ती म्हणजे, सणाचे प्रयोजन! त्यानुसार तो सण सूर्योदयानंतर साजरा करायचा की सूर्यास्तानंतर हे ठरते. महाशिवरात्री, नारळी पौर्णिमा, दिव्याची अमावस्या, नवरात्री, कोजागिरी पौर्णिमा हे सण रात्री म्हणजे सूर्यास्तानंतर साजरे करायचे सण आहेत. या सणांना साधारणपणे रात्र जागवून ध्यानधारण करणे वगैरे शांतपणे करायच्या गोष्टी होणे अपेक्षित असते. दसरा, अश्विनी पौर्णिमा, गणेश चतुर्थी, गुढीपाडवा हे सण दिवसा म्हणजे सूर्योदयानंतर साजरे करायचे आहेत. या सणांना दैवताची प्राणप्रतिष्ठापना, ओवाळणे वगैरे धामधुमीच्या गोष्टी करणे अपेक्षित असते. जे सण रात्री साजरे करायचे आहेत त्यांच्यासाठी सूर्यास्ताच्या वेळची तिथी पाहतात तर जे सूर्योदयानंतर साजरे करायचे आहेत त्यांच्यासाठी सूर्योदयाच्या वेळची तिथी पाहतात. ज्या तिथीला दोन्ही प्रकारचे सण साजरे होतात, ती तिथी त्या दिवशीच्या सूर्योदयाआधी सुरू होऊन सूर्यास्तानंतर संपत असेल तर दोन्ही सण एकाच दिवशी साजरे होतात. पण जर ती तिथी सूर्योदयानंतर सुरू होत असेल तर रात्री साजरा होणारा सण त्याच दिवशी सूर्यास्तानंतर आणि दिवसा साजरा होणारा सण त्याच्या पुढच्या दिवशी तिथी चालू असेपर्यंत साजरा करतात. २०१६ साली अश्विन पक्षातील पौर्णिमा १६ ऑक्टोबरला दुपारी १ वाजून २६ मिनिटांनी चालू होऊन १७ ऑक्टोबरला सकाळी ९ वाजून ५३ मिनिटांनी संपली, त्यामुळे कोजागिरी पौर्णिमा १६ तारखेला रात्री साजरी केली तर अश्विनी पौर्णिमा १७ तारखेला दिवसा! त्याच वर्षी श्रावणातील पौर्णिमा १७ तारखेला दुपारी ४ वाजून २७ मिनिटांनी सुरू झाली आणि १८ तारखेला दुपारी २ वाजून ५७ मिनिटांनी संपली. त्यामुळे नारळी पौर्णिमा १७ तारखेला रात्री आणि राखी पौर्णिमा १८ तारखेला सकाळी साजरी केली.

भारतात असे विशेषकरून लिहिण्याचे कारण म्हणजे, सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळा स्थानाप्रमाणे बदलत जातात, परंतु तिथी सुरू होण्याच्या आणि समाप्तीच्या वेळा मात्र सर्व ठिकाणी सारख्याच असतात. अगदी अचूक लिहायचे झाले तर प्रत्येक ठिकाणच्या सुर्योदय आणि सूर्यास्ताच्या UTC वेळा बदलतात कारण त्या ठिकाणच्या अक्षांशरेखांशावर अवलंबून असतात. पण तिथी सुरु होण्याच्या आणि संपण्याच्या वेळा मात्र अक्षांश आणि रेखांशावर अवलंबून नसल्याने त्यांच्या UTC वेळा ह्या सर्व ठिकाणी सारख्याच असतात. याचा परिणाम म्हणून भारतात जी तिथी सूर्योदयानंतर सुरू होईल ती यरोपमध्ये सूर्योदयापूर्वी सुरू झालेली असू शकते. यामुळे भारतात जे सण सलग दोन दिवशी साजरे होतील, ते युरोपमध्ये एकाच दिवशीही साजरे होऊ शकतात.

दुभंगलेल्या सणांमागचे हे कारण स्पष्ट झाले असेल अशी आशा करतो. आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.