गुरुवार, १० जुलै, २०१४

प्रयोजन

ज्योतिषाकडे सल्ला मागायला येणाऱ्यांत अनेक क्षेत्रांतले, वेगवेगळ्या वयाचे लोक असतात. त्यांच्या समस्यांचे विषयही अनेकविध, अगदी लग्न किंवा मूल कधी होईल पासून ते बाजारात अडकलेला शेंगदाणा कधी विकला जाईल इथपर्यंत. ह्या अनेकविध विषयांवरच्या प्रश्नांना उत्तरं द्यायला ज्योतिषाला मदत करतात ते फक्त बारा ग्रह, बारा राशी आणि बारा घरं. पत्रिका मांडल्यापासून ती सोडवून उत्तरं शोधण्यापर्यंतचा प्रवास एखादं अवघड प्रमेय सोडवण्याइतकाच रंजक आणि कधी कधी बुद्धीला ताण देणारा असतो. दिलेल्या उत्तरांची‌ अचूकता कधी कधी ज्योतिषालाही‌ चकित करते आणि जेव्हा उत्तरं पूर्ण चुकतात तेव्हा ज्योतिषी‌ तितकाच गोंधळूनही जातो. त्यामुळे ज्योतिषाच्या कथा युद्धाच्या कथांप्रमाणेच रम्य असतात. अशा कथा या ब्लॉगवर आपण पाहूच पण त्याहूनही जास्त मला ज्योतिषाच्या वैज्ञानिक मांडणीत जास्त रस आहे.

ज्योतिषासंबंधी वेगवेगळे प्रयोग करून वेगवेगळ्या पुस्तकात दिलेल्या नियमांची सत्यता पडताळणे हा माझा छंद आहे. अशा प्रयोगांविषयी लेख ह्या ब्लॉगमध्ये वाचाल. किंबहुना, त्यामुळेच या ब्लॉगचे नाव "ज्योतींची प्रयोगशाळा" असे ठेवले आहे. ह्या ब्लॉगद्वारे अशा प्रयोगांना आणि त्यासंबंधीच्या चर्चेला व्यासपीठ मिळाले तर उत्तमच. अशा प्रकारचे प्रयोग करणाऱ्यांचं‌ इथे स्वागत आहे. या ब्लॉगच्या माध्यमातून आपले प्रयोग मांडायचे असतील तर मला जरूर कळवा.

नमनाला एवढं तेल पुरे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा