गुरुवार, २ ऑक्टोबर, २०१४

संततियोग प्रयोग आणि संशोधन

फलज्योतिषात अनेक पद्धती प्रचलित आहेत. ह्या प्रत्येक पद्धतीत अनेक नियम आहेत, त्यातले काही परस्परविरोधीही आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे,  ह्यातल्या कित्येक (जवळजवळ सगळ्याच) नियमांना सिद्धांताची जोड दिसत नाही. एखादा नियम तसा का आहे, याचं विवेचन फारसे आढळत नाही. किंबहुना त्यामुळेच ज्योतिषाला अवैज्ञानिक शास्त्र म्हणवले जाते. यातले बरेच नियम लागू पडताना दिसतात आणि बरेच नाही. हा नीरक्षीर विवेक कसा करायचा हा मोठा प्रश्न आहे. त्याचे सोपे परंतु कष्टप्रद उत्तर म्हणजे, प्रत्यक्ष निरीक्षणांशी ज्या नियमांचा मेळ बसतो ते नियम स्वीकारणे आणि उरलेले सोडून देणे. आम्ही "प्रथम संतति कधी होते?" हा प्रश्न घेऊन हे प्रयोग सुरु केले.

या लेखात वापरलेल्या ज्योतिषीय संकल्पना समजण्यासाठी संदर्भपृष्ठांचा वापर करावा.

पद्धत

हातात असलेला वेळ आणि उपलब्ध साधने याचा विचार करता कुठल्यातरी एकाच पद्धतीचा उपयोग करणे शक्य होते. कृष्णमूर्ती ज्योतिष  पद्धतीचा सोपेपणा आणि अचूकता ह्या दोन गोष्टींचा विचार करून त्या पद्धतीनुसार प्रयोग सुरु केले. ह्या नियमांना सैद्धांतिक बैठक नसल्यामुळे, त्यांची गुणवत्ता मोजण्यासाठी Statistical Hypothesis Testing चा वापर केला. ह्या पद्धतीत एखादे गृहितक निव्वळ शक्यतेमुळे (Random Chance) खरे वाटत नाही ना हे तपासले जाते.

सध्या कृष्णमूर्ती पद्धतीची वेगवेगळी संस्करणे वापरली जातात. आम्ही कृष्णमूर्तींच्या Readers मधील खालील नियम वापरले. विशेषत: राहु, केतू यांचे ग्रहांच्या दृष्टी आणि योगांमुळे बदलणारे कारकत्त्व तसेच ग्रहांचे दृष्टी आणि योगांनी बदलणारे कारकत्त्व विचारात घेतले नाही.
  1. ग्रह त्याच्या (विंशोत्तरी) दशांमध्ये त्याच्या कारकभावांसंबंधी फळे देतो.
  2. ग्रहाचे कारकभाव पुढीलप्रमाणे
    1. ग्रह जिथे आहे ते भाव
    2. ग्रह ज्या भावांचा स्वामी आहे ते भाव
    3. ग्रहाचा नक्षत्रस्वामी जिथे आहे आणि तो ज्या भावांचा स्वामी आहे ते भाव
  3. या फळांची अनुकूलता उपनक्षत्रस्वामीवरून ठरते. उपनक्षत्रस्वामीचे कारकत्त्व वरील नियमाप्रमाणे मानावे.
  4. राहु आणि केतू त्यांच्या राशीस्वामी जिथे आहे आणि ज्या भावांचा स्वामी आहे त्या भावांचे कारक होतात.
कृष्णमूर्ती पद्धतीनुसार प्रथमसंततिच्या वेळी कुटुंबात वाढ होते, जातकाला तसेच त्याच्या जोडीदाराला पहिले अपत्य मिळते. त्यामुळे या वेळी धन, पंचम आणि लाभ या भावांच्या कारक ग्रहांच्या दशा चालू असतात.

निरीक्षणे

२०० पालक आणि त्यांच्या पहिल्या संतति यांच्या जन्मवेळा, जन्मस्थळे यांच्या माहितीवरुन त्यांच्या कुंडल्यांचा अभ्यास करून केलेली निरीक्षणे पुढीलप्रमाणे
  1. ८५% पालकांच्या बाबतीत प्रथमसंततिच्या वेळी पंचमभावच्या कारक ग्रहांच्या दशा (महा, अंत:, वि) चालू होत्या. वरील नियमांनुसार ठराविक वेळी एखाद्या भावाच्या कारक ग्रहाची दशा चालू असण्याची निव्वळ शक्यता (Probability) ७०% असते. म्हणजेच प्रथम संतति आणि पंचमभावाच्या कारक ग्रहाची दशा याचा संबंध निव्वळ शक्यतेपेक्षा जास्त आहे.
  2. धन आणि लाभ भावांबाबत मात्र हे प्रमाण कमी दिसून आले. विशेषत: वडिलांच्या बाबतीत या भावांचे प्रमाण निव्वळ शक्यतेइतकेच होते. आयांच्या बाबतीत धन भावाचे प्रमाण पंचम भावाच्या खालोखाल दिसून आले. लाभस्थानाचे प्रमाण मात्र निव्वळ शक्यतेइतकेच दिसले. म्हणजेच, आयांच्या बाबतीत धन भावाचा आणि प्रथम संततिचा संबंध दिसला, पण वडिलांच्या बाबतीत तसा तो दिसला नाही, किंबहुना पंचमभाव सोडता तो तसा कुठल्याच भावासंबंधी दिसत नाही.
सुरुवातीला म्हणल्याप्रमाणे पुस्तकातील सर्व नियम जसेच्या तसे लागू होताना दिसत नाहीत. पण लागू होणारे नियम या पद्धतीने वेगळे करता येतात. उदा. संततिसाठी पंचमभाव पहावा किंवा कुटुंबस्थानासाठी धनभाव पहावा, हे नियम पुस्तकांत मिळतात, परंतु "तसे का?" याचा विचार पुस्तकांत होताना दिसत नाही. या प्रयोगातून ते सांख्यिकीदृष्ट्या सिद्ध करणे शक्य आहे.

त्याबरोबरच ग्रहदशा, गोचर याबरोबरीने इतर कुठले घटक यावर परिणाम करतात का याचाही शोध या पद्धतीने घेता येइल. संगणकातील प्रगतीमुळे, खूप मोठ्या प्रमाणात माहितीचे विश्लेषण करणे शक्य आहे. आम्ही हाच प्रयोग मोठ्या प्रमाणावर करत आहोत. त्यासाठी सांख्यिकीच्या नियमांनुसार १००० पालक आणि त्यांच्या पहिल्या संततिच्या जन्मवेळा आणि जन्मस्थळे गोळा करत आहोत. याचा उपयोग आणखी सूक्ष्म आणि अचूक नियम मिळवण्यासाठी होइल.

आपण आपली माहिती देण्यास उत्सुक असाल तर ह्या Google Form चा वापर करा.

२ टिप्पण्या:

  1. मानवी जीवन हे ज्योतिषीय गणिता पेक्षा आणखीन काहीतरी वेगळे आहे या मताशी आल्यानंतर मी परत लग्न स्थान म्हणजे हा जो मी आहे त्यालाच समजून घेण्याचा प्रयत्न करतोय त्यास किती वर्ष लागतील माहिती नाही. गणितीय भाग हा कालमापक आहे पण कर्म सिद्धांत,पुनर्जन्म सिद्धांत, पंचकोष सिद्धांत, आत्मा , मन , दिशा व पंचमहाभूते यांचे बेमालूम एकत्रिकरण जमावयास पाहिजे.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. हा माझा प्रांत नाही, त्यामुळे मी याबाबत फार बोलू शकत नाही. आपल्या प्रयत्नात आपल्याला यश मिळो, ही प्रार्थना. कुठलेही शास्त्र हे शास्त्रीयतेच्या कसोटीवर उतरायलाच हवे. ज्योतिषशास्त्र जर भूतभविष्य दर्शविणारे असेल तर त्याचे नियम मर्यादांसकट सिद्ध व्हायलाच हवेत. सद्यस्थितीत ज्योतिषशास्त्राची अवस्था तशी नाही. त्यात फार अस्पष्टता आहे. सैद्धांतिक बैठकीचा, नियम पडताळून पाहण्यासाठीच्या प्रयोगांचा अभाव आहे. त्याला शास्त्रीय बैठक आणण्यासाठी चाललेल्या प्रयत्नांमध्ये माझा हा खारीचा वाटा आहे इतकंच!

      हटवा