शुक्रवार, १० जुलै, २०१५

नात्यातील गैरसमज - ज्योतिषाची मदत

अरविंद (नाव बदलेले आहे) माझ्याकडे त्याच्या मोठ्या बहिणीशी सध्या संबंध नीट नाहीत अशी तक्रार घेऊन आला. त्याच्या म्हणण्याप्रमाणे नक्की काय बिघडले होते हे त्याला कळत नव्हते. त्याने प्रश्न विचारला तेव्हाची पत्रिका मी मांडली (प्रश्नकुंडली १).
प्रश्नकुंडली १: ५ ऑक्टोबर, २०१३, १२:०४, पुणे

प्रश्नकुंडलीत प्रश्न, त्यासंबंधीची सर्व परिस्थिती यांचे प्रतिबिंब असते. मग ती परिस्थिती भूत, वर्तमान किंवा भविष्य या कुठल्याही काळातील असो. मोठे बहिण किंवा भाऊ लाभस्थानावरून पाहतात. चंद्र दशमात म्हणजे लाभाच्या व्ययात त्यामुळे मोठ्या बहिणीशी बिघडलेल्या संबंधाविषयी प्रश्न आहे दिसत होतं. त्याचप्रमाणे अष्टमातला चंद्र मानसिक ताणही दाखवत होता. त्यात चंद्र स्वनक्षत्रात, शुक्राच्या उपनक्षत्रस्वामीमध्ये, शुक्र लाभेश, स्त्रीदर्शक ग्रह, प्रश्नाची सर्व ओळख पटली. आता निदान करायचं होतं.

या कुंडलीत शुक्र, मंगळ केंद्रयोग आहे. शुक्र लाभेश आणि मंगळ पंचमेश, म्हणजे लाभाचा सप्तमेश. लाभस्थान मोठ्या बहिणीचं तर पंचमस्थान तिच्या पतीचं. त्यात ते शुक्र मंगळ म्हणजे विवाहसौख्याशी (की असौख्याशी) संबंधित ग्रह. मी अरविंदला त्याच्या बहिणीचे तिच्या पतीशी संबंध कसे आहेत हे विचारलं. असे नसते अगोचरपणे ज्योतिषाला करावेच लागतात. प्रश्नकुंडलीने दाखविलेल्या शक्यता पडताळूनच उत्तरं मिळतात. आश्चर्यचकित होऊन त्याने मला त्यांचा काही महिन्यांपूर्वी घटस्फोट झाल्याचं सांगितलं. दशमाचा उपनक्षत्रस्वामी राहु स्वनक्षत्रात, लाभात लाभाशी युती करताना दिसला. राहु अशा स्थतीत गैरसमज, मनात दाटलेली काळोखी, जळमटे दाखवितो. मी अरविंदला त्यांच्यात काहीतरी गैरसमज झाल्याचे सांगितले. हे गैरसमज तिच्या वैवाहिक आयुष्यातील दु:खद घडामोडींमुळे आहेत ह्याची कल्पना दिली.

"मग आता काय करू? हे नातं पुन्हा कसं जुळवू?", अरविंदने विचारलं. प्रश्नकुंडली, प्रश्न दाखवते, त्याची पार्श्वभूमी दाखविते, आणि उत्तरंही देते. लाभाचा उपनक्षत्रस्वामी बुध दशमात पडलेला दिसला. तो दशमात असला तरीही लाभाशी होऊ घातलेल्या युतीत होता. बुध वाणी, संवादाचा कारक आहे. मी अरविंदला, स्वत: मागील सर्व गोष्टी विसरून बहिणीशी मोकळेपणाने बोलायला सांगितलं. अरविंदला अशा बोलण्यातून गैरसमज आणखी वाढतील का अशी चिंता पडली होती. मजा अशी की दशमाचा उपनक्षत्रस्वामी लाभातून दशमात चालला होता आणि लाभाचा उपनक्षत्रस्वामी दशमातून लाभात. स्वस्थानी जाणाऱ्या या ग्रहांनी, दोघे बहिण-भाऊ आपले मतभेद विसरून एकत्र येणार, हे मला निसंदिग्धपणे दाखवलं, आणि त्याप्रमाणे ते झालंही!

ग्रहदेखील न बोलता आयुष्यातलं नाट्य किती समर्थपणे दाखवतात? पहायला जरा कवीचं हृदय हवं इतकंच!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा