शनिवार, १६ सप्टेंबर, २०१७

संततिसाठी नियोजन




"भाग्यसंकेत" या ज्योतिष विषयाला वाहिलेल्या नामांकित मराठी नियतकालिकाच्या २०१५ सालच्या दिवाळी अंकात माझा "संततिसाठी नियोजन" या नावाने एक लेख प्रसिद्ध झाला होता. सध्याच्या काळात विवाहानंतर जोडप्याला एकमेकांसाठी वेळ देणं, त्यांच्या व्यसाय किंवा नोकऱ्या, त्यानिमित्ताने देश, शहरं बदलणं किंवा आर्थिक सुबत्ता आणि मुलं सांभाळण्याची परिस्थिती येईपर्यंत वाट पाहणं यात विवाहानंतर बराच काळ निघून जातो. योग्य परिस्थिती निर्माण झाल्यावर संततिसाठी प्रयत्न सुरु होतात. पण हवी असून संतति होतेच असे नाही किंवा संतति होण्यास बरीच वाट पहावी लागते. अनेक पत्रिकांच्या अभ्यासातून केलेल्या निरीक्षणांतून यामागील कारणे आणि उपाय यांचा उहापोह या लेखात केला आहे. ज्योतिषाच्या मदतीने संततिसाठी नियोजन करण्याचा विचार मी या लेखात मांडला आहे. या लेखाच्या शेवटी, विवाहासाठी वधुवरांची पत्रिका पाहतानाच ज्योतिषाशी संततिसाठी नियोजनाबाबत चर्चा करण्याचा वेगळा विचार मी मांडला आहे. 

सामान्यपणे जातकाच्या पत्रिकेत संततिसाठी अनुकूल काळ पुरेसा असतो, कुठलेही ज्योतिष न पाहता अनुकूल काळात संततिचे नियोजन विनासायास होते आणि संततिही होते. परंतु काही पत्रिकांमध्ये हा काळ विवाहानंतर योग्य वयात कमी असतो, किंवा प्रतिकूल काळ जास्त असतो. अशावेळी मात्र पत्रिका पाहून वेळच्या वेळी नियोजन केल्यास संततिबाबत निराश होणे पदरी येत नाही. हा लेख वाचून एक साखरपुडा झालेले जोडपे माझ्याकडे आले आणि त्यांनी संततिनियोजनाबाबत प्रश्न विचारले. त्यांतील वधूच्या पत्रिकेत संततिला अनुकूल काळ खूप कमी असल्याचे माझ्या लक्षात आले. त्यांनी संततिचा निर्णय लांबविला तर त्यांना उशीरा संतति होईल किंवा न होण्याची शक्यता असल्याचे सांगितले. त्यांचा विवाह डिसेंबर २०१६ मध्ये होणार होता आणि सुदैवाने विवाहानंतर २०१७ च्या दिवाळीच्या सुमारास संतति होण्याचे योग होते. विवाहानंतर लगेचच संतति झाल्यास मोकळा वेळ मिळणार नाही म्हणून ते थोडे नाराज झाले, परंतु मी समजावल्यानंतर विवाहानंतर नियमन न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

या वर्षाच्या सुरुवातीला त्यांनी मला दिवस गेल्याची गोड बातमी दिली आणि काही दिवसांपूर्वी बाळ बाळंतीण सुखरूप असल्याची बातमी देखील. संतति न झाल्याने निराशाग्रस्त झाल्यावर ज्योतिषाची मदत घेण्यापेक्षा हा पर्याय चांगला नाही का?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा