शनिवार, १७ जानेवारी, २०१५

मकरसंक्रांत आणि उत्तरायण वास्तविक संबंध

पृथ्वीवरून पाहिल्यास सूर्य एका ठराविक वर्तुळात फिरताना दिसतो. या वर्तुळाला क्रांतीवृत्त असे म्हणतात. संस्कृत धातू क्रम् यावरून क्रांती हा शब्द आला आहे. क्रम् याचा अर्थ ओलांडणे, चालणे, फिरणे असा आहे. सूर्य या वर्तुळावरून फिरतो म्हणून ते "क्रांतीवृत्त". या क्रांतीवृत्ताचे बारा भाग कल्पिलेले आहेत त्यांना राशी असे म्हणतात. संक्रांत याचे मूळ सुद्धा क्रम हाच धातू आहे, त्यावरून एखाद्या राशीत सूर्याने प्रवेश करणे याला संक्रांत म्हणतात. प्रत्येक राशीच्या नावे एक याप्रमाणे १२ राशींच्या १२ संक्रांती असतात. सूर्य निरयन मकरराशीत प्रवेश करतो त्या दिवसाला मकरसंक्रांत म्हणतात. या दिवशी उत्तरायण सुरु होते अशी समजूत आहे. उत्तरायण म्हणजे देवांचा दिवस (मनुस्मृती अध्याया १ श्लोक ६७) मानला असल्याने, त्या दिवसाची सुरुवात म्हणजे देवांचा ब्राह्ममुहूर्त म्हणून, हा दिवस विशेष मानला जातो. परंतु खरंच मकरसंक्रांत ही उत्तरायणाची सुरुवात आहे का?

उत्तरायण म्हणजे काय हे जाणून घेण्यासाठी, पृथ्वीच्या उत्तरगोलार्धातून सूर्याचे भ्रमण कसे दिसते ते पाहू. सूर्य पूर्वेकडे उगवताना दिसत असला तरी, तो अगदी पूर्वेकडून फक्त दोनच दिवशी उगवतो. इतर दिवशी तो पूर्व-उत्तर किंवा पूर्व-दक्षिण या दिशांमध्ये उगवतो. ज्या काळात सूर्योदयबिंदू  (क्षितिजावर जिथे सूर्योदय होतो तो बिंदू) थोडा थोडा दक्षिणेकडे सरकतो, त्या काळाला दक्षिणायन (अयन म्हणजे सरकणे) म्हणतात. ज्या काळात सूर्योदयबिंदू उत्तरेकडे सरकतो, त्याला उत्तरायण म्हणतात.

रोज सूर्योदय उगवताना त्याचे निरीक्षण केले तर असे दिसून येईल की २२ जून ते २१ डिसेंबर या कालावधीत सूर्योदयबिंदू थोडा थोडा दक्षिणेकडे सरकतो, आणि २२ डिसेंबरनंतर पुन्हा २१ जूनपर्यंत तो उत्तरेकडे सरकतो. वर्षभर ज्यांना हे निरीक्षण करायचा कंटाळा आहे, त्यांनी Stellarium सारखी प्रणाली वापरून खात्री करावी. म्हणजे दक्षिणायन २१ डिसेंबर किंवा २२ डिसेंबरलाच संपते आणि तेव्हाच उत्तरायणदेखील सुरु होते. त्यामुळे मकरसंक्रांतीला उत्तरायण सुरु होत नाही हे सूर्यप्रकाशाइतकेच ढळढळीत सत्य आहे.

आता प्रश्न असा आहे की मकरसंक्रांतीला सण म्हणून जे जे करतात, उदा. तीळगुळ वाटणे, गुळपोळीचा आहार, काळे कपडे घालणे, वाण देणे, कोवळ्या भाज्या, बोरे, फळे सुगड्यात भरून ते वाण देवीला देणे, ह्याच वस्तूंनी लहान बाळांना आंघोळ घालणे (बोरनहाण) ह्या गोष्टी कधी कराव्यात? ह्या प्रत्येक गोष्टीचा संबंध हिवाळ्याशी आहे. त्यामुळे हिवाळ्याच्या मध्यभागी म्हणजेच दक्षिणायन संपताना डिसेंबरमध्ये २१ किंवा २२ तारखेला त्या करणे योग्य. हा सण खरेतर मकरसंक्रांतीचा नसून उत्तरायणाशी संबंधित आहे, तो उत्तरायण सुरु होतानाच करणे इष्ट!

मुळात मकरसंक्रांत आणि उत्तरायणाची सुरुवात हा संबंध कुठे आला ते पहावे लागेल. क्रांतीवृत्तावरील चार बिंदू सूर्याच्या भासमान भ्रमणामुळे महत्त्वाचे ठरतात: क्रांतीवृत्त आणि अवकाशीय विषुववृत्त (पृथ्वीच्या विषुववृत्ताचे अवकाशतील प्रक्षेपण) जिथे एकत्र येतात ते दोन बिंदू (वसंतसंपात, शरदसंपात), दक्षिणायन आणि उत्तरायण सुरु होताना सूर्य जिथे असतो ते दोन बिंदू. हे बिंदू तारकापुंजांच्या सापेक्ष स्थिर नसून ते दरवर्षी राशीचक्रात मागे सरकतात. साधारण इ.स. ४९९ मध्ये वसंतसंपात रेवती ताऱ्याजवळ होता (सध्या तो उत्तराभाद्रपदा नक्षत्रात आहे). त्यावर्षी उत्तरायण सुरु होताना सूर्य निरयन मकरराशीच्या आरंभी असला पाहिजे. या काळात मकरसंक्रांत (सूर्याचा निरयन मकर राशीत प्रवेश) आणि उत्तरायण हे एकाच दिवशी होत असावे. सूर्योदयबिंदूचे अयन अतिशय हळू होत असते, त्यामुळे दिवसागणिक त्यात फार फरक दिसत नाही. त्यातच वातावरणाच्या प्रभावामुळे सूर्योदयबिंदू नुसत्या निरीक्षणाने निश्चित करणे कठीण असते. त्यामुळे उत्तरायण निश्चित कधी सुरु झाले किंवा होईल हे सांगणे नुसत्या निरीक्षणाने अवघड असते. त्याउलट सूर्याचा मकरराशीत प्रवेश निश्चित करणे तुलनेने सोपे. १५०० वर्षांपूर्वीची साधने, गणितातील प्राविण्य विचारात घेता, मकरराशीत प्रवेशावेळी उत्तरायण साजरे करणे हा मार्ग तेव्हाच्या शास्त्रकारांनी घालून दिला असावा. त्यातील चूक फारशी लक्षात येण्याजोगी नसल्याने ते चालून गेले असावे. पण आज गणितातील आणि संगणकीय सुधारणांमुळे ग्रहांची अगदी विकलेपर्यंत स्थिती निश्चित करता येत असताना, आपण ही १५०० वर्षांपूर्वीची प्रथा अजूनही आंधळेपणाने पाळणे बरोबर नाही.

दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, मकरसंक्रांतीपासून पुढे दोन महिने सूर्य शनिच्या राशींमध्ये असतो. रवि हा ग्रहमंडलातील राजा वैभव, तारुण्य, सोने, जीवन, सुख, उत्साह यांचा कारक तर शनि हा ग्रहमंडलातला दास दारिद्र्य, वार्धक्य, शिसे, मृत्यू, दु:ख, नैराश्य यांचा कारक. ह्या दोन राशी त्यांच्या स्वामीप्रमाणेच सूर्याला विपरीत गुणांच्या आहेत. त्यात सूर्य प्रवेश करत असतानाचा दिवस सण म्हणून कसा साजरा करता येईल? त्यामुळेच की काय पण हा सण लग्नानंतर पहिला सण असल्यास साजरा करत नाहीत आणि किंवा या दिवशी कोणी शुभकार्याचा आरंभही करत नाहीत. याउलट २१-२२ डिसेंबरला हा सण साजरा केल्यास कुठलेच अशुभाचे सावट त्यावर राहणार नाही.

अजूनही मकरसंक्रांत थंडीत येत असल्याने फारसा फरक पडत नाही, परंतु आणखी हजार वर्षांनी मकरसंक्रांत उन्हाळ्यात येऊ लागेल तेव्हा ऊष्ण तीळगुळ खाऊन कसे चालेल आणि सुगड्याचे वाण द्यायला तेव्हा भर उन्हाळ्यात कोवळी गाजरे, बोरे कशी मिळतील?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा