रविवार, १५ मार्च, २०१५

गहाळ सामान: चंद्राचा प्रश्न आणि त्याचेच उत्तर

कुंडली म्हणजे सूर्य पृथ्वीभोवती ज्या वर्तुळातून फिरताना दिसतो, त्या मार्गाची (क्रांतीवृत्ताचा) नकाशा. मजा अशी की चंद्रासकट सगळे ग्रह (ज्योतिषीय अर्थाने) ह्याच वर्तुळाजवळून फिरताना दिसतात. क्रांतीवृत्तावरील तारे पृथ्वीवरून स्थिर दिसतात, त्यामुळे ह्या नकाशात, प्रामुख्याने ग्रहांची स्थिर ताऱ्यांच्या सापेक्ष स्थाने दाखवलेली असतात. जन्मकुंडली, म्हणजे त्या त्या व्यक्तीच्या जन्मवेळचा क्रांतीवृत्ताचा नकाशा. ज्योतिषाला विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर जन्मकुंडलीवरून देणे शक्य असतेच असे नाही. अशावेळी ज्योतषी प्रश्न विचारलेल्या वेळच्या क्रांतीवृत्ताच्या नकाशाचा वापर करतो, त्या नकाशाला प्रश्नकुंडली म्हणतात.

प्रश्नकुंडली: ९ मार्च २०१५ १५:२१, पुणे
चंद्र हा मनाचा कारकग्रह मानला आहे. चंद्राचे कारकत्व प्रश्न विचारायला येणाऱ्याचे मन कुठे आहे हे दाखवते. प्रश्नकुंडलीची मजा अशी की, प्रश्न विचारणाऱ्याने प्रश्नाचा उच्चार जरी केला नाही (तो मनात ठेवला), तरीही प्रश्नकुंडलीवरून ज्योतिषी प्रश्न काय आहे याचा अंदाज लावू शकतो. याचा उपयोग ज्योतषी प्रश्न ताडून पाहण्यासाठी करतात. विचारलेला प्रश्न खरंच तसाच विचारणाऱ्याच्या मनात आहे का हे पहिल्यांदा पाहिले जाते. तसे असेल तर तीच प्रश्नकुंडली प्रश्नाचे उत्तर देण्यासाठीही वापरली जाऊ शकते. थोडक्यात विचारणारा प्रश्न आणि उत्तर बरोबरच घेऊन येत असतो. ज्योतषी फक्त ते उत्तर वाचून दाखवतो. प्रश्नकुंडली ज्योतिषाला नवीन काहीतरी शिकवूनही जाते.

९ मार्च २०१५ रोजी १५:२१ ला मला प्रश्न विचारला तो असा. हे गृहस्थ परदेशी गेले होते. त्यांचे सामान तिकडे दोन दिवस झाले तरीही पोचले नाही. दुसऱ्या दिवशी हे गृहस्थ दुसऱ्या शहरात जाणार होते. तिथे असेपर्यंत सामान मिळेल का? सामानात सर्व परकीय चलन, खाण्याचे पदार्थ (शाकाहारी लोकांसाठी जपान, युरोपातील काही देशात जायचे असेल तर गरजेचे), कपडे सगळेच होते. त्यामुळे चांगलीच गैरसोय होत असणार. त्यावेळची प्रश्नकुंडली(टीपा पहा) दिली आहे.

या कुंडलीत चंद्र षष्ठस्थानात, तृतीयेश, चतुर्थेश, आणि त्याचा नक्षत्रस्वामी मंगळ लाभात, सप्तमेश, व्ययेश. म्हणजे चंद्र हा ३, ४, ६, ११, १२ या स्थानांचा कारक आहे. यातील ३, १२ एकत्र ही स्थाने प्रवास विशेषत: परदेशप्रवास दाखवतात. ११ हे स्थान काहीतरी मिळवण्यासंबंधीचा प्रश्न दाखवते. ४ ह्या स्थानाने एकूण सामान दाखवले. पण ६ व्या स्थानाचा संदर्भ मला लागेना. एखादी गोष्ट मिळेल का, ह्यासाठी ११ व्या स्थानाचा उपनक्षत्रस्वामी त्या गोष्टीसंबंधी स्थानाचा कारक असावा लागतो. ह्या कुंडलीला लाभाचा उपनक्षत्रस्वामी शुक्र १, ६, ११ (शुक्राचा नक्षत्रस्वामी बुध) २, १० या स्थानांचा कारक आहे. तो ४ चा कारक नाही, म्हणून सामान मिळणार नाही असे उत्तर द्यावे का अशा विचारात मी असताना, चंद्र ६ व्या स्थानात आहे आणि लाभाचा उपनक्षत्रस्वामीही ६ चा कारक आहे, हे विशेष वाटले. सातवे स्थान एखाद्या बाबतीतील सहयोगी दाखवते. या प्रश्नात विमानप्रवास ही बाब धरली तर सहयोगी म्हणजे विमानकंपनी. ६ हे ७ व्याचे व्यय (आधीचे) स्थान, विमानकंपनीच्या ताब्यातून सुटणाऱ्या गोष्टी दाखवते. इथे हरवलेले सामान मिळवणे ही समस्या नाही, तर विमानकंपनीकडून ते मिळेल का हा प्रश्न असल्याने सामानाच्या कारक स्थानापेक्षा ६ वे स्थानच महत्त्वाचे आहे, हे चंद्राच्या स्थानाने माझ्या लक्षात आले. ह्या तर्काला पुस्तकी आधार नसल्याने मी साशंक मनाने, सामान मिळेल असे सांगितले. चंद्र मंगळाच्या नक्षत्रात आणि मंगळ लाभात असल्याने दिवस संपायच्या आत मिळेल असेही सांगितले. खरोखरीच त्या दिवशी हे गृहस्थ दिवसभराची कामे आटपून त्यांच्या हॉटेलवर जायच्या आत विमानकंपनीने ते तिथे पोचवले होते. चंद्रानेच प्रश्न टाकला आणि त्यानेच उत्तरही दिले. प्रश्न आणि उत्तर शेजारी असतात ते असे.

टीप: हा प्रश्न मला सासऱ्यांनी ज्येष्ठ जावयाबद्दल विचारला असल्याने, पंचमाचे सप्तम स्थान लग्नी ठेवून काढलेली कुंडली दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा