शनिवार, २१ मार्च, २०१५

भारत विरुद्ध बांग्लादेश, कोण जिंकेल? प्रश्नकुंडलीतील प्रश्नाचे महत्त्व

ज्योतिष शिकताना महत्वाचा म्हणजे सराव. तो मला घरच्यांकडून आणि मित्रांकडून भरपूर मिळत आलेला आहे. मला वास्तविक क्रिकेटमध्ये फार रस नाही, पण क्रिकेटच्या स्पर्धा सुरु झाल्या (हल्ली त्या वर्षभर चालूच असतात) की हे लोक मला सामन्यांचा निकालाबाबत प्रश्न विचारतात. अशा प्रश्नांमधून ज्योतिषाचे प्राथमिक धडे पक्के होतातच, पण ज्योतिषातील नियमांचे वस्तुनिष्ठ परीक्षण करायला भरपूर वाव मिळतो. त्याचे एक उदाहरण म्हणजे, परवाचा भारत विरुद्ध बांग्लादेश सामना!

एखाद्या सामन्यात इच्छित संघ/खेळाडू जिंकेल का? प्रकारच्या प्रश्नांमध्ये कृष्णमूर्ती ज्योतिषाचे नियम खालीलप्रमाणे आहेत
१. लग्नस्थान हे जो जिंकेल का असा प्रश्न आहे त्याचे आणि सातवे स्थान हे विरोधी संघाचे/माणसाचे धरावे. विरोधी संघ हरतो, म्हणजे त्याचे व्यय स्थान फलित होते, म्हणून हा प्रश्न सहाव्या (सातव्याचे व्ययस्थान) स्थानावरून सोडवतात.
२. प्रश्नकुंडलीत चंद्र सहाव्या स्थानाचा कारक असेल तर ती कुंडली बरोबर उत्तर देते. 
३. इच्छित संघ/माणूस जिंकेल का याचे उत्तर सहाव्या स्थानाचा उपनक्षत्रस्वामी देतो. हा उपनक्षत्रस्वामी जर ६ (सातव्याचे व्ययस्थान) किंवा सहयोगी स्थाने १० (कर्तृत्व स्थान), ११ (लाभ, इच्छापूर्तीचे स्थान) यांचा कारक असेल तर इच्छित संघ जिंकतो, नाही तर हरतो.
४. इतर प्रश्नकुंडलीचे नियम उदा. वक्री ग्रहांचे कारकत्व इथेही लागू होतात.

भारत विरुद्ध बांग्लादेश सामन्यात भारत जिंकेल का हा प्रश्न मला तीन जणांनी वेगवेगळ्या वेळी विचारला. त्या प्रश्नकुंडल्या खाली दिल्या आहेत. त्यांचा क्रमाने विचार करू.

प्रश्नकुंडली १: 18/Mar/2015 16:01:00 पुणे
प्रश्नकुंडली १ मध्ये चंद्र मंगळाच्या धनिष्ठा नक्षत्रात आहे. तो १, ७, ५, ९, १० या स्थानांचा कारक आहे, सहाव्याचा नाही, त्यामुळे ह्या कुंडलीवरून उत्तर देता येणार नाही असे मी सांगितले. सहाव्या स्थानाचा उपनक्षत्रस्वामी रवि, शनिच्या नक्षत्रात असून शनि वक्री आहे, त्यामुळे जर मी उत्तर दिले असते तर भारत हरेल असे द्यावे लागले असते आणि अर्थातच ते चुकले असते.

प्रश्नकुंडली २: 19/Mar/2015 10:41:00, पुणे
प्रश्नकुंडली २ मध्ये चंद्र राहुच्या नक्षत्रात आहे. तो २, ३, ५, १० या स्थानांचा कारक आहे, सहाव्याचा नाही, त्यामुळे ह्या कुंडलीवरून उत्तर देता येणार नाही असे मी सांगितले.  सहाव्या स्थानाचा उपनक्षत्रस्वामी गुरु वक्री, बुधाच्या नक्षत्रात २, ३, ५, ८, १०, ११ या स्थानांचा कारक आहे. तो १०, ११ चा कारक असल्याने भारत जिंकेल असे उत्तर आले असते, पण गुरु मार्गी झाल्यावर, म्हणजे ९ एप्रिलनंतर. सामना कितीही रंगला तरी तो इतके दिवस नक्कीच चालला नसता, त्यामुळे हे उत्तर हास्यास्पद ठरले असते.

प्रश्नकुंडली ३: 19/Mar/2015 08:49:00, पुणे
प्रश्नकुंडली ३ मध्ये चंद्र राहुच्या नक्षत्रात आणि राहु ६ व्या स्थानात, त्यामुळे प्रश्न बरोबर जुळला. सहाव्या स्थानाचा उपनक्षत्रस्वामी राहु बुधाच्या नक्षत्रात ३, ४, ६, ११ या स्थानांचा कारक आहे, त्यामुळे भारत हा सामना जिंकेल असे सांगितले जे उत्तर खरे आले.  या सामन्यात आघाडीच्या फलंदाजांनी ज्या पद्धतीने विकेट फेकल्या आणि बांग्लादेशाच्या फलंदाजांनी ज्या पद्धतीने धावांमध्ये कंजुषी केली, ती राहुला साजेशी होती.






सट्ट्यासाठी या पद्धतीचा उपयोग होत नाही. सट्टेबाज जेव्हा प्रश्न विचारतो, तेव्हा तो प्रश्न ठराविक संघ/खेळाडू जिंकेल का असा न दिसता, सट्टेबाजाला पैसे मिळतील का असा दिसतो. सट्टेबाजाला जर पैसे मिळणार नसतील, तर त्याने सट्टा लावलेला संघ जिंकत नाही. अशा परिस्थितीत मुळात कुंडलीत प्रश्न दिसत नाही, त्यामुळे ज्योतिषी उत्तर देऊ शकत नाही आणि दिलेच तर ते चुकते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा